नी.गो.पंडितराव वक्तृत्व स्पर्धा

श्री समर्थ सेवक मंडळाच्या उपक्रमांपैकी गेली ४७ वर्षे सातत्याने सुरू असलेला आणि युवावर्गातील वक्ते घडवणारा उपक्रम म्हणजे कै. नी. गो. पंडितराव स्मृती वक्तृत्व स्पर्धा. महाराष्ट्रातील अनेक मान्यवरांनी ज्या स्पर्धेच्या माध्यमातून वक्तृत्वाचे धडे गिरवले.

पण हे पंडितराव कोण? त्यांचा आणि श्री समर्थ सेवक मंडळ यांचा संबंध काय? आणि त्यांचे या स्पर्धेला नावं का देण्यात आले हे आजच्या पिढीला माहीत होणे मला आवश्यक वाटते आहे. ठाणे शहरातील प्रसिद्ध मो. ह. विद्यालयात इंग्रजी व मराठी विषय शिकविणारे विद्यार्थी प्रिय शिक्षक एवढीच त्यांची ओळख नव्हती तर इंग्रजी, मराठी साहित्याचे उपासक, सिद्धहस्त पत्रकार, मराठी चित्रपट रंगभूमीचे मार्मिक समीक्षक, धारदार लेखणी व डौलदार वाणीची अभिजात देणगी लाभलेले सौदर्योपासक अशी त्यांची ओळख होती.

स्पर्धेचे विषय ठरविताना सर्व समिती सभासदांना विषय सुचविण्यास सांगितले जाते. त्यांनी सुचविलेल्या विषयांची विभागणी करण्यात येते. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा विषयक व ज्वलंत विषय. जवळ जवळ १०० एक विषय सुचविले जात असत. त्याहून ५/५ विषय दोनही गटासाठी निश्चित केले जातात.
पंडितराव स्पर्धेचे विशेष म्हणजे नियोजित व उस्फूर्त अशा दोन्ही विभागांत स्पर्धकांना भाग घेणे बंधनकारक आहे. त्यामुळे स्पर्धकांचा कस लागतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना संदर्भ ग्रंथ वाचनाची गोडी लागते. उस्फूर्त विषय तर फारच गंमतीशीर असतात.

मंडळाच्या शताब्दी महोत्सवा निमित्ताने स्पर्धा आयोजकांचा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात विविध स्पर्धा संयोजक आपुलकीने सहभागी झाले. या मेळाव्यातील चर्चा सत्रात सध्याच्या काळात स्पर्धा संयोजकांसमोर असलेली आव्हाने, अडचणी यावर उहापोह करण्यात आला. सध्याच्या बदलत्या आणि डिजीटल मिडियाच्या अतिक्रमणाच्या काळातही वक्तृत्व कलेची आवश्यकता आणि उपयुक्तता संपलेली नाही, उलट जीवनाच्या अनेक क्षेत्रात ही कला उपयोगी ठरते असे ह्या मेळाव्यात सहभागी झालेल्या संयोजकांचे म्हणणे होते. मंडळाच्या माध्यमातून उत्तम वक्ते असलेल्या कै.नी. गो. पंडितराव यांची स्मृती वक्तृत्व स्पर्धेच्या माध्यमातून जतन केली जात
आहे आणि महाराष्ट्रातील भावी वक्ते घडविण्याचे कार्य होत आहे.