श्री हनुमान व्यायामशाळा

समर्थ रामदास स्वामींच्या शिकवणुकीतील बलोपासना हे तर श्री समर्थ सेवक मंडळाचे मुख्य ध्येय. सुदृढ शरीर आणि सशक्त मन घडविण्यासाठी १९२५ साली मंडळाने श्री हनुमान व्यायाम शाळा स्थापन केली. मैदानी खेळांपासून ते सांस्कृतिक कार्यक्रमांपर्यंत चौफेर योगदान देणारा हा उपक्रम गेली ९१ वर्षे अविरत सुरू आहे.

तरुणांमध्ये बलोपासनेचे संस्कार व्हावेत तसेच बलवान शरीरामध्ये सशक्त मन असते या जाणिवेमुळे पूर्वीच्या जुन्या मुंबई रस्त्यावरील भाड्याच्या जागेमध्ये सन १९२५ साली श्री हनुमान व्यायाम शाळेची स्थापना करण्यांत आली. जागेच्या अभावामुळे सुरुवातीला बंदिस्त जागेमध्ये दंड, जोर, बैठका, सूर्यनमस्कार या सारखे व्यायाम केले जात. मंडळाला लालबाग येथे मासुंदा तलावाचे समोर अंदाजे ३६०० स्क्वेअर मीटर एवढी जागा उपलब्ध झाल्यावर तेथे उभ्या केलेल्या इमारतीमध्ये विविध व्यायाम प्रकारांसाठी उपकरणे घेतली गेली, कुस्तीचा आखाडा आणि मल्लखांब यामुळे ही व्यायाम शाळा अनेकांच्या कौतुकाचा विषय होता. या अंतर्गत व्यायामशाळेत तयार झालेल्या अनेक मल्लांनी तसेच वेटलीफ्टर्सनी राष्ट्रीय स्तरावर स्पर्धा जिंकलेल्या आहेत. मंडळाच्या वरील जागेवर असलेले अनेक उंचवटे आणि खुरटी झाडे साफ करून सपाट मैदान तयार करण्यांत आले. याच मैदानावर श्री हनुमान व्यायाम शाळेचा बाह्य विभाग सुरु झाला. या मैदानावर खो-खो, हुतुतू, आट्यापाट्या, लंगडी यांसारख्या देशी खेळांचे सामने मोठ्या प्रमाणांत आयोजित करण्यांत येत असत. विविध प्रकारच्या कवायती आणि खेळ खेळण्यासाठी तरुणांची झुंबड उडत असे. काही क्रीडापटुंनी राष्ट्रीय स्तरावर खेळून आपले आणि मंडळाचे नाव उज्वल केले. श्री हनुमान व्यायाम शाळेने आपला अमृत महोत्सव सन २००० साली मोठ्या दिमाखाने साजरा केला आणि नवीन उपक्रमांची मुहूर्तमेढ रोवली. बदललेल्या समाज जीवनामुळे हनुमान व्यायाम शाळेच्या बाह्य विभागाचे स्वरूप सध्या बदललेले असून सध्या मैदानावर संध्याकाळी बालभवनची मुले खेळांत रममाण होत असतात. सण आणि राष्ट्रीय दिनांचे औचित्य साधून अनेक कार्यक्रमांचे आयोजन करून मुलांवर चांगले संस्कार केले जातात.

१४ ऑगस्ट १९४७ पासून आजपर्यंत रात्री १२ वा. व्यायाम शाळेचे विद्यार्थी, कार्यकर्ते, माजी विद्यार्थी, पालक जमून झेंडा वंदनाने स्वातंत्र्यदिन साजरा केला जातो. त्यावेळी सुमारे ३०० लोकांची उपस्थिती असते.