शिव समर्थ विद्यालय

फेब्रुवारी १९६२ ला “शिव समर्थ विद्यालय, प्राथमिक विभागास अनुदानित मराठी शाळा म्हणून मान्यता मिळाली. शैक्षणिक क्षेत्रातील हे संस्थेचे दुसरे पाऊल व नंतर माध्यमिक विभाग १९७७ साली सुरू झाला. सहा दशकांहून अधिक काळ शिवसमर्थ विद्यालय ही शाळा विद्यार्थी, पर्यायाने उद्याचे नागरिक घडविण्याचे काम करीत आहे. मातृसंस्थेच्या ध्येयधोरणांनुसार बलोपासनेपासून ते राष्ट्रभक्तीपर्यंत आणि वक्तृत्वसाधनेपासून ते सामाजिक बांधिलकीपर्यंत विद्यार्थ्यांवर सुसंस्कार घडवून राष्ट्रउभारणीचे काम करीत आहे.

मंडळाच्या शिव समर्थ विद्यालयाचा प्राथमिक विभाग सुरु झाला आणि यथावकाश इयत्ता १ ली पासून ७ वी पर्यंतचे वर्ग चालू करण्यांत आले. इयत्ता ८ वी पासून पुढे शिक्षणाची सोय नसल्याकारणाने बरीचशी हुशार मुले इयत्ता ४ थी नंतर शाळा सोडून दुसऱ्या शाळेत जात असत. सातवी पास झालेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता ८ वी मध्ये इतर शाळांमध्ये प्रवेश मिळविणे अडचणीचे होऊ लागले या कारणास्तव शासन दरबारी अथक प्रयत्न करून शिव समर्थ विद्यालयाचा माध्यमिक विभाग सुरु करण्यांस अनुमती मिळाल्यावर शिव समर्थ विद्यालयाचा माध्यमिक विभाग सन १९७७ साली सुरु करण्यांत आला. श्री. लागू मास्तर यांचे मार्गदर्शनाखाली आणि श्री. साठे मास्तर यांचे शिक्षण समितीच्या अध्यक्षतेखाली शिव समर्थ विद्यालयाच्या माध्यमिक विभागाची यशस्वी वाटचाल सुरु झाली. सन १९८७ साली साधना इमारतीचा तिसरा मजला बांधण्यात आल्यावर शाळेचे वर्ग इयत्ता १० वी पर्यंत सकाळ आणि दुपार सत्रांमध्ये भरविणे सुरु झाले. शाळेसाठी अद्ययावत प्रयोगशाळा बांधण्यात आली. ग्रंथ हेच आपले गुरु असे मानून सुसज्ज अशा ग्रंथालयाची उभारणी केली गेली. यासाठी अनेक दानशूर व्यक्तींनी आपले योगदान दिले. श्री. साठे मास्तर यांचे प्रेरणेमुळे सन १९७८ पासून शाळेचे वर्ग सुरु होण्यापूर्वी क्रमाक्रमाने इयत्ता ४ थी ते इयत्ता ९ वी च्या विद्यार्थ्यांचा परिपाठ घेण्यांत येऊ लागला. परीपाठामध्ये काही श्लोक, स्तोत्रं, अथर्वशीर्ष, अभंग, गीते, कविता, समरगीते, राष्ट्र्गीते यांचा समावेश असल्यामुळे तसेच श्री. साठे मास्तरांच्या शिस्तीमुळे विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार झाले. आज जीवनामध्ये यशस्वी झालेल्या तसेच विद्यालयाचे अन्य माजी विद्यार्थ्यांना परीपाठाचे त्यांच्या जीवनघडणीवर झालेल्या चांगल्या परिणामांचे महत्व कळले म्हणूनच विद्यालयाचा अविभाज्य भाग असलेल्या परीपाठाची त्यांना सतत आठवण होत असते. परीपाठामध्ये अंतर्भूत केलेल्या सर्व गीतांचा समावेश असलेली भावसाधना पुस्तिका तसेच विद्यार्थ्यांची वाणी शुद्ध व्हावी शब्दोच्चार स्पष्ट व्हावे व संस्कृत भाषेबद्दल त्यांना ओढ लागावी म्हणून पाथेय नावाची पुस्तिका विद्यार्थ्यांना दिली जाते. शैक्षणिक अभ्यासक्रमाशिवाय इतर स्पर्धात्मक परिक्षांचे आयोजन विद्यालयातर्फे केले जाते किंवा अन्य संस्थांतर्फे आयोजित केलेल्या स्पर्धांमध्ये भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाते. माध्यमिक विभागांतील मुलामुलींच्या क्रीडास्पर्धा व सामने, वार्षिक समारंभाचे निमित्ताने मोठ्या प्रमाणावर कवायतींची प्रात्यक्षिके आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. सध्या संगणक हा आपला सर्वांच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनलेला आहे. या पुढील काळांत प्रत्येकाला आपल्या दैनंदिन कामकाजासाठी संगणकाचा वापर अनिवार्य होणार आहे. काळाची पावले ओळखून मंडळाने माध्यमिक विभागासाठी स्वतंत्र संगणक विभाग विकसित केला. अनेक दानशूर दात्यांकडून भेट मिळालेले, सरकारी योजनेमधून मिळालेले किंवा मंडळाने विकत घेतलेले अशा संगणकांमुळे वर्गामधील प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतंत्रपणे संगणक हाताळण्यास दिला जातो. या वयाच्या विद्यार्थ्यांना संगणक शिकणे अतिशय आवडते आणि मंडळाच्या उपक्रमाच्या जास्तीत जास्त लाभ विद्यार्थ्यांकडून घेतला जातो. विद्यालयाची अतिशय अत्याधुनिक संगणक प्रयोगशाळा ही विद्यालयाच्या अभिमानाची बाब आहे. माध्यमिक शालांत परीक्षेमध्ये शिव समर्थ विद्यालयाचा निकाल साधारणतः ९० टक्क्यांचे जवळपास लागतो. विद्यालयाच्या यशामध्ये मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सहभाग महत्वाचा आहे.

सामाजिक कार्य करणाऱ्या बाह्य संस्थांच्या मदतीने विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी, व्यवसाय मार्गदर्शन, प्रथमोपचार, प्रशिक्षण, शुद्धलेखन वर्ग, वाचन, संस्कार वर्ग या व अशा अनेक उपक्रमांतून विद्यार्थ्यांचा शारीरिक, मानसिक, बौद्धिक, भावनिक विकास साधण्याचा सातत्याने प्रयत्न केला जातो. विद्यालयामध्ये क्रीडा मैदानी खेळ यासाठी पोषक वातावरण आहे. विद्यालयाचे मैदान, तालुका पातळी वरील खो-खो, कबड्डी सारखा संघिक खेळांसाठी वापरले जाते, साहजिकच शाळेतील विद्यार्थ्यांनाही यामुळे प्रोत्साहन मिळते. बाह्य संस्थांनी आयोजित केलेल्या सांघिक व वैयक्तिक क्रीडा स्पर्धांमध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थी सहभागी होतात. शालांत परीक्षेचा निकाल हा माध्यमिक शाळांचा मानबिंदू असतो. या निकषास अनुसरून, गेली तीन वर्षे विद्यालयाचा निकाल सतत चढता असून २०१५ साली ९९% रिझल्ट लागला. तसेच ९०% हून अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही वाढली. आज ठाण्यातील मराठी माध्यमांच्या नामंकित शाळांमध्ये शिव समर्थ विद्यालय गणले जाते. श्री समर्थ सेवक मंडळ, ही आमची मातृसंस्था कायम पाठीशी असल्यानेच हे प्रत्यक्षात होऊ शकले, याची जाणीव इथे काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्यास आहे.

शिव समर्थ विद्यालयाच्या माध्यमिक विभागातून घडलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी उद्योग जगतापासून ते संरक्षण क्षेत्रापर्यंत भरीव कामगिरी केली आहे.