शिव समर्थ विद्यालयाची गंगोत्री म्हणजे शिशु ज्ञानवर्धन शाळा. चिमुकल्या बालकांवर सुसंस्कार करण्याचे आणि आदर्श नागरिकत्वाची पायाभरणी करण्याचे काम ही शाळा करत आहे.
अध्यापन प्रक्रियेत बालक-पालक-शिक्षक हे तीन बिंदू अतीव महत्त्वाचे असतात. पालक आणि शिक्षक यांचे वर्तन बालक केंद्री असावे लागते. शिशु ज्ञानवर्धन शाळेच्या पालक शिबिराचे सूत्र ‘बालक पालक’ नाते हेच आहे. शाळेत तीन दिवसाची शिबिरे होत होती. त्या शिबिरात लहान मुलांच्या आजाराचे तज्ज्ञ डॉक्टर्स, मानसशास्त्र, कलाशिक्षक, पोषक आहार तज्ज्ञ डॉक्टर्स, समुपदेशक, अनुभवी शिक्षक व समाजसेवक यांची मार्गदर्शनपर भाषणे, कृतिसत्रे, अनुभवकथन आयोजित केली जात असत. कै. ज्योतिका ओझरकर व कै. मोहन पाठक यांनी बरेच वर्षे ह्या शिबिराचे उपक्रम राबविण्यास सहकार्य केले.
शिशु ज्ञानवर्धन शाळेच्या, पालकांचा मेळावा १९८१ साली झाला मेळाव्याला पालकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. पूर्व प्राथमिक शिक्षण हे प्राथमिक शाळेची पूर्व तयारी आहे का? या विषयावर आयोजित केलेल्या परिसंवादात कै. विमलताई कर्वे, देवधर, भार्गवे या शिक्षण तज्ज्ञांनी भाग घेतला. या परिसंवादाचे संचालन भावना भार्गवे यांनी केले. शिशु संगोपन,बालवाडी या बाबत पालकांचे गैरसमज, मुलांची मानसिक व शारीरिक वाढ, अंकावरून अक्षर ओळख, प्रवेशाचे वय, साधने त्यांची निर्मिती व उपयोग, पालकांचे पाल्याचे बाबतीतील विविध प्रश्न ह्यावर वरील वक्त्यांनी आपले विचार मांडले. आजही शिशु ज्ञानवर्धन शाळा आपल्या परंपरेनुसार चिमुकल्या बालकांवर सुसंस्कार करून राष्ट्राचे भावी नागरिक घडविण्याचे कार्य जोमाने करीत आहे.