स्त्री कल्याण संघटना

श्री समर्थ सेवक मंडळाने आपल्या उपक्रमांमध्ये, पुरुषांच्या बरोबरीने महिलांना नेहमी सामावून घेतले. हनुमान व्यायाम शाळेच्या पटांगणापासून ते समर्थ संजीवनी विहिरीतील पोहण्याच्या वर्गापर्यंत महिलांना सर्वत्र मुक्त प्रवेश होता.

साठ सत्तर वर्षांपूर्वीचा काळ लक्षात घेतला तर स्त्री ही परावलंबी होती. त्यामुळे संसारामध्ये आणि समाजामध्ये स्त्रीचे स्थान दुय्यम प्रकारचे होते. जरी काही स्त्रिया शिक्षण घेऊन सज्ञान झाल्या होत्या तरी बहुसंख्य स्त्रिया या मात्र चूल, मुल आणि संसार यामध्ये गुरफटून गेल्या होत्या. स्त्रियांचा शैक्षणिक विकास व्हावा तसेच स्त्रियांनी उद्योगशील व्हावे व आर्थिकदृष्ट्या स्वत:च्या पायावर उभे राहावे या विचाराने कै. नानासाहेब दामले यांचे प्रेरणेने १ ऑगस्ट १९५४ रोजी स्त्रियांची एक संघटना स्थापन करण्यांत आली व २६ जानेवारी १९५६ रोजी या संस्थेचे नामकरण “स्त्री कल्याण संघटना” असे समारंभपूर्वक करण्यांत आले. सभासद भगिनींना वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून जुनी मासिके व पुस्तके त्यांना देण्यांत आली. अर्थार्जनासाठी म्हणून लाकडाची खेळणी बनविण्याचा उद्योग, तसेच शिलाई मशीन्स पुरवून शिलाई काम शिकविण्याचे वर्ग आयोजित केले. उद्देश हाच की स्त्रीने स्वकमाईचे पैसे जमवून आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र व्हावे व स्वत:च्या पायावर उभे रहावे. बदलत्या काळानुरूप बहुतांश स्त्रियांनी शिक्षण घेतल्यामुळे त्यांना काही प्रमाणांत आर्थिक स्थैर्य प्राप्त झाले होते त्यांच्या बुद्धीमत्तेला चालना मिळावी म्हणून स्त्रियांच्या वक्तृत्व, नाट्यवाचन, कविता वाचन इत्यादी स्पर्धांचे आयोजन तसेच धार्मिक सण आणि उत्सवांचे निमित्ताने कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. मंडळाच्या शिशु ज्ञानवर्धन शाळेची स्थापना झाल्यावर ती कार्यान्वित करून त्या शाळेचे संपूर्ण व्यवस्थापन स्त्री कल्याण संघटनेच्या सभासदांनी केले होते.

आजही स्त्रीकल्याण संघटनेतर्फे महिलांसाठी श्रावणी-शुक्रवार व पाल्यांचा गौरव, वासंतिक वसंतोत्सव, तिळगूळ समारंभ, प्रश्नमंजूषा स्पर्धा, क्रीडा स्पर्धा, कथाकथन स्पर्धा अशा विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी स्नेहसंमेलनात विविध गुणदर्शन कार्यक्रम असतोच.
गेली ५० वर्षे चार्तुमासात विविध पोथ्यांचे वाचन भगिनी करत असत पण हल्ली २ वर्षे आम्ही त्यात थोडा बदल केला तो असा की चार महिने चांगले काहीतरी ऐकण्यासाठी प्रवचने ठेवली. गेल्यावर्षी सौ. मीरा लिमये यांनी १६व्या अध्यायातील पहिल्या दोन श्लोकात असणारे दैवी गुणसंपत्ती यावर प्रवचने दिली. यंदा श्री. श्रीकांत रानडे यांचे नाम मंत्रातील विज्ञान यावर प्रवचने झाली. दोन्ही वेळेला आमच्या सर्व भगिनी व ठाणेकरांचा उदंड प्रतिसाद लाभला.