श्री समर्थ सेवक मंडळ, ठाणे

हरिभाऊ घाणेकर

हरिभाऊ दामले

विसाव्या शतकाचा प्रारंभ म्हणजेच क्रांतीचा उष:काल. याच कालखंडामध्ये इंग्रज सरकारने भारतीय नेत्यांवर अनन्वित अत्याचार केले. लोकमान्य टिळकांसारख्या महान देशभक्ताला तुरुंगवासाची शिक्षा तर स्वातंत्र्यवीर सावरकरांना जन्मठेपेची शिक्षा झाली.

अशा या सामाजिक परिस्थितीमध्ये ठाणे शहरांतील काही तरुणांना वाटू लागले की परमेश्वराची कृपा झाल्याशिवाय स्वातंत्र्य आणि यश प्राप्त होणार नाही. त्याच बरोबर ज्ञानोपासना, बलोपासना, तरुणांचे संघटन करणे ही काळाची गरज असल्याचे पटल्यामुळे अशी विचारसरणी असलेले काही मध्यम वर्गीय तरुण मंडळी एकत्र आली व त्यांनी दासनवमीचा उत्सव सन १९०५ मध्ये सुरु केला. परंतु ध्येयविहीन कार्यपद्धतीला काहीतरी संघटीतस्वरूप यावे अशी जिज्ञासा त्यांचे मनांत उत्पन्न झाली व आपल्या कार्याला एका संस्थेच्या चौकटीमध्ये बद्ध करण्यासाठी या तरुणांनी शनिवार, दि. १ जुलै १९१६ (आषाढ शुद्ध प्रतिपदा शके १८३८) रोजी श्री समर्थ सेवक मंडळ, ठाणे या संस्थेची स्थापना केली. संस्था स्थापन करण्यामध्ये सर्वश्री हरिभाऊ घाणेकर आणि नानासाहेब दामले यांचा प्रमुख भाग असला तरी गुरुवर्य वाघमास्तर, ग. ल. जोशी, कां. चिं. ब्रह्मे, गो. ना. आठवले, शं. ग. घाणेकर, कृ. ना. मोकाशी यांचा सहभाग होता. मंडळाचे ब्रीदवाक्य ‘मुख्य ते हरिकथा निरुपण, दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपण, सर्व विषयी…’ व मंडळाचे कार्य चालवण्याचे ध्येय या मंडळींनी ब्रीद्वाक्यानुसार निश्चित केले व भजनोपासना आणि आपल्या विविध उपक्रमांद्वारे लोककल्याणाचे कार्य व कार्यक्रम वर्षानुवर्षे सातत्याने चालविले आहेत. म्हणूनच मंडळाचे कार्य शुक्लेन्दुवत वाढत गेलेले आहे.

स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेल्या मंडळाने काळाबरोबर वाटचाल करीत अनेक नवनवीन उपक्रम सुरु केले व कालबाह्य उपक्रम बंद केले.मंडळाचे कार्य आणि कार्यक्रम मंडळाच्या विविध उपक्रमांच्या माध्यमांतून आजमितीस केले जाते.काही उपक्रमांचा कार्यविस्तार एखाद्या स्वतंत्र संस्थेप्रमाणे झालेला आहे.
लोकाभिमुख आणि राजकारणापासून अलिप्त असलेल्या मंडळाचे कार्य ठाणे शहरामध्ये सर्वश्रुत आहे, एक अग्रेसर संस्था म्हणून मंडळाला नावाजले जाते.